आमचं गावच एक मंदीर

सर्वांगीण ग्रामविकासात घेतली उतुंग झेप

Malegaon Grampanchyat"जिवा भावानं जवा मी पाहील, माझ गावच मंदीर शोभल" या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामविकासाची गोडवी गाणार्या भजनातील प्रत्येक ओवीचे दर्शन माळेगाव, ता.सिन्नर जि.नाशिक ने घडविले औद्योगिकरणामुळे मेगासिटीची चाहुल लागलेल्या व दिल्ली, मुंबई औद्योगिक कॉरीडॉर म्हणुन विकसित होऊ घातलेल्या सिन्नर शहरापासुन अवघ्या ३ कि.मी अंतरावर माळेगाव – मापारवाडी या जुळ्या गावांनी ग्रामविकासात उत्तुंग झेप घेतली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे २ आक्टोबर २०१० रोजी गावात ग्रामोन्नतीची मुहुर्तमेढ घट्ट रोवण्यात आली अन गावाचे संपुर्ण स्वरुपच पलटले .पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेमधे दुसर्या वर्षाला ग्रामपंचायत पात्र ठरली आहे. गावात आणि परिसरात लोकसंख्येपेक्षा जास्त झाडांची लागवड करणेत येऊन संगोपण केले जात आहे. आमच्या गावचे ग्रामविकास आधिकारी श्री.संजय पोपट गिरी यांना महाराष्ट्र शासनाने यशवंत राज दिन १२ मार्च २०१३ रोजी गुणवंत कर्मचारी पुरस्कार मा. राज्यपाल महोदय, मा.ग्रामविकास मंत्री, मा.ग्रामविकास राज्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलेला आहे. सन २०१२/१३ मध्ये संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळालेले आहे. गावाच्या या उल्लेखनिय कामामधे पुर्वीच्या सर्व सरपंच,पदाधिकारी यांनी मजबुत पाया घालुन दिल्यामुळे गावाने इथपर्यंत मजल मारलेली असल्याचे कृतज्ञतापुर्वक नमुद करावेसे वाटते.

गावाची पूर्वस्थिती

औद्योगिक क्षेत्र माळेगावची पुर्वस्थिती फारच बिकट होती. ग्राम स्वच्छता अभियानाचा सुगंध माळेगाव येथे पोहचण्यापुर्वी गावात घाणीची दुर्गंधी सुटली होती. गावाच्या चारही बाजुने उघड्यावर शौचास जाण्याची घाणेरडी व लाजिरवाणी सवय ग्रामस्थांना जडली होती. गावात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्रज्य होते ग्रामस्वच्छता अभियानात दृढ निर्धाराने सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामविकासाच्या हाकेला मनापासुन साथ दिली अन अवघ्या वर्ष भरातच संपुर्ण गांव हागंदरी मुक्त केले. २ आक्टोबर २०१० रोजी घंटागाडी ऊपक्रम सुरु करुन कचरा गावाबाहेर डेपोत टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर ग्रामविकासात माळेगावने कधीच मागे वळून बघितले नाही. आज ग्रामोन्नोतिची अनेक शिखरे सर केली आहत. ग्रामविकासाचे अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबऊन व ग्रामस्थांच्या सर्वांगिण विकासासाठी अहोरात्र झटणार्या ग्रामपंचायतीची आता ग्रामविकासाशी पक्के नाते जोडले गेले आहे.